Samir Lande 03 Sep 2025 कहानियाँ प्यार-महोब्बत Samir lande love box mrathi ती समीर लांडे एक हळव्या मनाचा प्रवाशी 13489 0 Marathi :: मराठी
कॉलेजचा पहिला दिवस. अंगावर जरा जडसा शर्ट, मनात ओढ, थोडी भीती, थोडं काहीतरी नवीन गवसण्याची अनामिक हुरहूर. गेट ओलांडतानाच हृदयात एक विचित्र धडधड उठली. आजूबाजूला अनोळखी चेहरे, खळखळाट, आणि पावसाने जरा दम धरलेला. पण मनात मात्र एक गडबड सुरू होती – "काय होईल? कुणी ओळखीचं सापडेल का? कुणी बोलेल का?" दगडी जिने चढत असताना अचानक समोरून ती आली. छत्री एका हातात, आणि दुसऱ्या हाताने ओल्या पदराला सावरत होती. केस भिजलेले, पण तरी कपाळावर एक निवांतपणा, चेहऱ्यावर एक न कळलेली चमक. तिच्या डोळ्यांत पाहताना वाटलं, जसं काळ थांबला असावा. आवाज ऐकू येत नव्हता, पण तिच्या पावलांची लय मनात घर करत होती. त्या एका क्षणात वाटलं, जसं मन कुणीतरी हळूच उचकटून नेलं. ओळख नव्हती, नाव तर दूरचं. पण तरीही तिच्या अस्तित्वानं त्या साऱ्या कॉलेजात एक अनोखी उब आली होती. "ती कोण आहे रे?" असं विचारावं वाटलं, पण कोणाला विचारावं, हाच प्रश्न होता. जवळ उभा असलेला मित्र तरी कुठं तिच्याकडे बघत होता? त्याला खुरडत सांगायचं म्हटलं तर... "ती... ती..." बस्स एवढंच. नाव माहिती नाही, वर्ग माहित नाही, पण तिला पाहिलंय, हे नक्की. दुसऱ्याच क्षणी ती वळली, आणि गर्दीत हरवून गेली. जसं एखादं स्वप्न क्षणभर येतं आणि पुन्हा अंधारात विरून जातं. ती गेली, पण तिचा तो क्षण जागा राहिला – स्थिर, हलणारा, पण विसरता न येणारा. त्यानंतर बऱ्याच वेळा तेच जिने चढले, तोच गेट ओलांडला, तीच वेळ गाठली... पण ती मात्र दिसली नाही. नाव काय ते विचारावं वाटत होतं, पण कुणाकडे? आणि विचारायचंही का? ती फक्त एक क्षण होती का? की काहीतरी जास्त? मनात वारंवार एकच ओळ घुमत राहिली – "जीवनात पहिल्यांदा मन चोरी झाल्याचं समाधान मिळालं, पण चोराचं नाव अजूनही माहित नाही." त्याच रात्री डायरी उघडली. काहीतरी लिहायचं होतं, पण शब्द थबकले. शेवटी वरच्या कोऱ्या पानावर फक्त एकच नाव लिहिलं – "ती." लेखक : समीर लांडे एक हळव्या मनाचा प्रवाशी